wanna lose weight?? #वजनदार

 

#गोलू पोलू


एक ना वेळ येते, जेव्हा वाटायला लागतं, आता बारीक होणारच नाही आपण...

माझ्या बाबतीत झालं होतं असं..

आणि गंमतीचा भाग काय असतो ना, आपण काय आहोत, आपली शैक्षणिक पात्रता, आपलं कर्तृत्व, आपण आपल्या कामावर किती प्रेम करतो, आपण आपल्या कुटुंबासाठी किती मेहनत करतो, आपण आजवर किती awards मिळवलीत किंवा आपल्याला जे जमतं ते खरंच अनेकांना नाही जमत.... या सगsssssळ्या गोष्टी फील ठरतात हो- महत्वाचं काय तर तुम्ही जाडे झालात. बायकांच्या/मुलींच्या बाबतीत तर जास्तच-

हे मला कळलं नाहीये फारसं, दोन बायका मिळून, दोन पुरुष मिळून किंवा एक बाई एक पुरुष मिळून एका पुरुषाच्या सुटलेल्या पोटा बद्धल त्या पुरुषाला ऐकू जाईल इतक्या आवाजात त्याच्याच तोंडावर बोलताना मी नाही पाहिलेत फारसे.. पण बाईच्या सुटलेल्या सगळ्या अवयवांवर यातल्या सगळ्या कॉम्बीनेशनचे लोक तिला मस्त कॉम्प्लेक्स देत असतात. शास्त्र असतंय ते!!

एनीवे, बॉडी शेमिंग हा विषय नव्हता खरंतर- पण आठवत राहतात काही बाही गोष्टी-

..एका कार्यक्रमाच्या निवेदना नंतर सगळी कडून कौतुकाचा वर्षाव होत असताना मित्राची आई जवळ आली, पाठीवर थोपटलं, मी स्माईल देऊन thank you म्हणणार इतक्यात म्हणाल्या, हे सगळं निवेदन वगैरे ठीके, पण बारीक व्हायचं मनावर घे आता-

..पोट इतकं सुटलं होतं की मॉल मध्ये शिरताना मी प्रेग्नंट आहे असं समजून सिक्युरिटी वाल्या मावशीनी चेकिंग वालं मशीन न फिरवता जाऊ दिलं होतं आत-

..एका कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रश भेटणार होता माझा... इतक्या वर्षांनी तो भेटेल, काय म्हणेल, माझ्या कामाचं कौतुक करेल का.. जुने दिवस आठवतील का या सुखद मूड मध्ये असताना त्याने मात्र भेटून मी इतकी सुटलेच कशी कशी यावरून इज्जत काढली होती-

..गणपती दिवाळी लग्न बारशी मुंजी नकोश्या वाटायला लागल्या होत्या कारण मावश्या आत्या काकू लोक माझं आणि आईचं (लग्ना नंतर तरी माझ्या वागण्याची जबाबदारी आई वर टाकू नका माझ्या) बौद्धिक घेत बसायच्या की मी कसं बारीक झालंच पाहिजे.

एक ना वेळ येते, जेव्हा वाटायला लागतं, आता बारीक होणारच नाही आपण...

माझ्या बाबतीत झालं होतं असं..

पण मग काहीतरी झालं... ज्याने झडझडून जागी झाले मी... आणि मनाशी ठरवलं, आता करेंगेच- मरेंगे नाही- मरतो तर आहोतच रोज. सगळ्यांकडून आपल्या शरीरा बद्धल ऐकून...

आजी म्हणायची, कोणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडलं हे महत्वाचं-

सो, उजाडलं!! पण उजाडेपर्यंतचा अंधार फार भीषण होता-

जिम मध्ये २ ४ वर्कआऊट नंतर रडू यायचं-

पाणीपुरी आठवून तोंडाला पाणी सुटायचं-

बटर वर खरपूस भाजलेला ब्रेड दिसला की आई मला खेळायला जाऊ दे नं वं मधल्या चैत्यासारखं, एकदा डायेट मोडू दे न वं असं विचारावंसं वाटायचं कोचला...

चहा कॉफी साखर खारी टोस्ट बिस्कीट सोडताना तर ब्रम्हांड आठवलं..

पण तुमचं शरीर ना गुणी असतं. मनापासून आणि इमानदारीत हे केलंत तर ते रिझल्ट दाखवायला लागतं.

या सगळ्यात एक गोष्ट लक्षात आली.. म्हत्वाचं काय असेल तर consistency! नियमितपणा.. १६ सोमवार, २१ मंगळवार अमुक तेवढे शुक्रवार व्रत का करायचे ते कळायला लागलं.. कारण सवय मोडून नवी सिस्टीम सेट सुरु व्हायला तितका वेळ जातोच-

तुम्ही सुरु केलीये का अशी कुठली नवीन हेल्दी सवय....?

प्लीज... बाकी काही करू नका, बस ती सवय जिवंत ठेवा..

सकाळी वॉक सुरु केला असेल. संध्यकाळी ७ च्या आत जेवायला घेतलं असेल. साखर सोडली असेल मैदा बंद केला असेल. पाणी भरपूर पीत असाल, घाम गळेपर्यंत वर्क आउट करत असाल..

कुठलीही सवय, पण प्लीज... मोडू नका-

कहाण्यांच्या भाषेत सांगायचं तर, उतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका.

मग बघा.. माझं जे झालं, त्या पेक्षा अजून कमाल तुमचं होईल.

मी तर सुरुवात केलीये नुकतीच- पण इथपर्यंतचा प्रवास अमेझिंग होता.

थकवणारा आणि नंतर सुखावणारा..

संकल्प करण्यासाठी १ जानेवारीची वाट कशाला बघायची...?

रविवार संपलाय- उद्यापासून.. करायची सुरुवात..?




 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

RainbowMaker...

शब्द शब्द जपून ठेव... बकुळीच्या फुलापरी...

lockdown... लॉकडाऊन